भाषांतर : अवधूत डोंगरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अन्नपदार्थांमध्ये विशेष रूची होती, असं बहुधा अनेकांना पटकन वाटणार नाही. पण आंबेडकरांच्या निकटवर्तीयांनी नोंदवलेल्या माहितीनुसार त्यांना चांगलं खायला आवडत असे.
आंबेडकरांना त्यांची पहिली पत्नी रमाबाई यांच्या हातची ‘बोंबील चटणी’ अत्यंत प्रिय होती, असं त्यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी नमूद केलं आहे. आंबेडकरांना परदेशात शिकत असताना पाश्चात्त्य खाद्यपदार्थांची चव पसंत पडली आणि ही त्यांची आवड आयुष्यभर टिकून राहिली, असं त्यांच्या दुसऱ्या पत्नी सविता यांनी आत्मचरित्रात नोंदवलं आहे.
Artwork – Vikrant Bhise, 2024
त्यांच्या खाद्यपदार्थांमधील रूचीमध्ये खूप वैविध्य नव्हतं; वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा स्वाद घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्यांपैकी ते नव्हते. त्यांचे एकंदर प्राधान्यक्रम आणि परिस्थिती बघता हे आश्चर्यकारकही नाही. ते एकाच वेळी अनेक लढाया लढत होते- आणि शक्तिशाली शत्रूविरोधातील त्यांचं हे लढणंही बहुतेकदा एकहाती असायचं. शिवाय, उपजीविका कमावणं, ढासळणारी तब्येत, यांचाही दबाव त्यांच्यावर होता. त्यामुळे वैयक्तिक रूची असणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना फारसा वेळ मिळाला नाही.
त्यांचं वाचनवेड मात्र याला अपवाद ठरलं. पण त्यांची वाचनाची आवडही खरंतर वैयक्तिक ध्यासाच्या पातळीवरची नव्हती. त्यांच्या ग्रंथालयाचं खाजगीपण अगदी काटेकोरपणे जपलं जात होतं, पण तिथे चालणारं त्यांचं वाचन मात्र पूर्णपणे त्यांना सार्वजनिक अवकाशात मांडायच्या कल्पनांशी किंवा त्यांना करायच्या असणाऱ्या युक्तवादांशीच संबंधित असायचं.
Artwork – Vikrant Bhise, 2024
आयुष्याच्या अखेरच्या दोन दशकांमध्ये आंबेडकरांना बागकाम करायला, व्हायलिन शिकायला आणि शिल्पकला व चित्रकला यांमध्ये हात चालवायला थोडा वेळ मिळाला.
त्यांना ओळखणाऱ्या काही लोकांनी नोंदवलेल्या आठवणींनुसार, आंबेडकर क्वचित प्रसंगी स्वयंपाकही करत असत. पण याबद्दल त्यांनी तपशिलात लिहिलेलं नाही वा ते यावर तपशिलात बोललेलेही नाहीत.
परंतु, आंबेडकरांच्या विचारविश्वामध्ये अन्नाचा संदर्भ ठळकपणे येतो- हा संदर्भ अन्नाच्या अभावाशी जास्त जोडलेला आहे.
न्यूयॉर्कमध्ये व लंडनमध्ये शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत असताना त्यांना व्यक्तीशः भुकेचा अनुभव घ्यावा लागला होता. या काळात त्यांना अगदी थोडंच जेवण घेणं परवडत असे, आणि त्यांचे मुंबईत मागे राहिलेले कुटुंबीय स्वतःची पोटं भरण्यासाठी संघर्ष करत होते.
आंबेडकर या अनुभवांबद्दल अनेकदा बोलले, पण त्यांचे विचार वैयक्तिक अनुभवांपलीकडे जाणारे होते. अस्पृश्यांना सहन करावा लागणारा पद्धतशीर जुलूम व त्यांची होणारी मानखंडना यांमध्ये सामाजिकदृष्ट्या लादलेली भूक केंद्रस्थानी आहे, असं त्यांनी स्पष्ट करून सांगितलं.
अनटचेबल्स, ऑर द चिल्ड्रेन ऑफ इंडियाज् घेट्टो या अपूर्ण राहिलेल्या पुस्तकातील “द इंडियन घेट्टो- द सेंटर ऑफ अनटचेबिलिटी- आउटसाइड द फोल्ड” अशा शीर्षकाच्या प्रकरणात त्यांनी या संदर्भातील विश्लेषण पुढीलप्रमाणे केलं आहे:
भारत हा मुख्यत्वे ‘शेतीप्रधान देश’ होता; तिथे शेती हा उपजीविकेचा मुख्य स्त्रोत होता. (आंबेडकरांनी हे लेखन केलं तेव्हा अर्थातच हे वास्तव होतं). पण सर्वसाधारणतः हा स्त्रोत अस्पृश्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. यामागे दोन कारणं होती. एक, जमीन खरेदी करण्यासाठीचं भांडवल अस्पृश्यांकडे नव्हतं. दोन, त्यांनी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना अनेकदा ‘स्पृश्य’ हिंदूंकडून आक्रमक विरोधाला सामोरं जावं लागत असे, कारण अस्पृश्यांचं हे ‘धाडसी कृत्य’ त्यांना आपल्या बरोबरीच्या स्थानावर आणून ठेवेल, असा धोका स्पृश्यांना वाटत होता. पंजाबसारख्या काही ठिकाणी तर अस्पृश्य शेतजमीन खरेदी करण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या पात्र मानले जात नव्हते.
अस्पृश्यांना केवळ मजुरीमधूनच उत्पन्न कमावणं शक्य होतं. त्यांच्याकडे या संदर्भातील व्यवहारांमध्ये वाटाघाटी करण्याची ताकदही नव्हती. स्पृश्य हिंदू ‘संगनमत’ करून अस्पृश्यांना ‘शक्य तितकी कमी मजुरी देत असत’. ही मजुरी रोख रकमेच्या किंवा धान्यांच्या रुपात असायची. उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये ‘गोबरहा’ म्हणजे ‘प्राण्यांच्या विष्ठेमध्ये मिळणारे धान्याचे दाणे’ मजुरी म्हणून दिले जात असत.
मार्च-एप्रिलच्या महिन्यात पीक जोमाने वाढलेलं असतं तेव्हा ते काढून वाळवलं जातं, मग ते झोडणीसाठी जमिनीवर पसरलं जातं. मग बैलांना त्यावरून चालवलं जातं; त्यांच्या खुराच्या दाबामुळे सालीतून धान्याचा दाणा वेगळा होतो. धान्यावरून चालताना बैल काही धान्य आणि गवत खातात. त्यांचं हे खाण खूप जास्त असतं, त्यामुळे त्यांना धान्य पचणं अवघड जातं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पोटातून शेणासोबत तेच धान्य बाहेर पडतं. हे शेण चाळून त्यातलं धान्य वेगळं काढलं जातं आणि अस्पृश्य कामगारांना मजुरी म्हणून दिलं जातं. मग या धान्याचं पीठ करून त्यातून अस्पृश्य लोक भाकऱ्या थापतात. (BAWS 5: 23-24).
Artwork – Vikrant Bhise, 2024
शेतीचा हंगाम संपल्यानंतर अस्पृश्यांना शेतकऱ्यांकडे काम मिळत नसे. मग ते गवत कापणं, जंगलातून जळणासाठी लाकूड कापणं आणि ते जवळच्या बाजारपेठांमध्ये जाऊन विकणं, अशा ‘अनिश्चित आणि तात्पुरत्या’ उत्पन्नास्त्रोतांकडे वळत.
आंबेडकर देशातील ज्या भागांशी परिचित होते त्या भागांमध्ये अस्पृश्यांना उपजीविकेसाठी एकच ‘खात्रीशीर’ स्त्रोत उपलब्ध होता: आपापल्या गावातील हिंदू कुटुंबांकडून अन्नाची ‘भीक मागण्याचा अधिकार’ अस्पृश्यांना होता. अस्पृश्यांना गावात कराव्या लागणाऱ्या शारीरिक श्रमाच्या सरकारी कामांसाठी मोबदला निश्चित करताना सरकारने हा ‘परंपरागत अधिकार’ लक्षात घेतला. अशा रितीने पारंपरिक भिकेचं रूपांतर ‘वैधानिक भिके’मध्ये करण्यात आलं.
एका अर्थी, अन्नासाठी भीक मागायला लावणारी व्यवस्था मोडून काढणं हा आंबेडकरांच्या राजकीय विचारातील व कृतीमधील प्रमुख भाग होता. महाराष्ट्रातील महाड इथे झालेल्या दोन ऐतिहासिक कार्यक्रमांपैकी पहिल्या कार्यक्रमात १९२७ साली झालेलं आंबेडकरांचं भाषण या संदर्भात पाहण्यासारखं आहे. (हे त्यांचं पहिलं मोठ्या स्तरावरचं भाषण होतं). शेती करा, व्यवसाय करा, शिका आणि नोकरदार व्हा, पण अन्नासाठी भीक मागणं थांबवा, असं आवाहन त्यांनी या वेळी उपस्थित श्रोत्यांना केलं.
Artwork – Vikrant Bhise, 2024
यानंतरच्या काळात आंबेडकरांनी अस्पृश्यांना जातीय जुलुमांपासून आणि त्यातून उद्भवणाऱ्या भुकेपासून मुक्त करण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाययोजनांची बाजू लढवली. अस्पृश्यांना शेतकरी होण्यासाठी पडीक जमिनी पुरवल्या जाव्यात; गावांमध्ये ते पुरवत असलेल्या सेवांसाठी त्यांना कंत्राटी, रोखीवर आधारित उत्पन्न मिळावं; त्यांना सरकारी सेवांमध्ये आरक्षण द्यावं; अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये किमान वेतनाची कायदेशीर मर्यादा निश्चित करावी; सार्वत्रिक विमा उपलब्ध व्हावा; आणि शैक्षणिक सुविधांचा विस्तार करावा- अशा उपाययोजनांचा त्यात समावेश होता.
यातील शेवटच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतः कृती केली आणि मुंबई व औरंगाबाद इथे महाविद्यालयं सुरू केली.
व्यापक अर्थाने बोलायचं तर, त्यांनी आधुनिक उद्योगाच्या मुक्तिदायी शक्तीवर विश्वास दाखवला. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स? या पुस्तकात ‘गांधीवादा’वर कठोर टीका करताना त्यांनी लिहिलं (BAWS 9: 283-84): ‘माणसाला पशुतुल्य अवस्थेत जगण्यापासून मुक्त करायचं असेल, त्याला फुरसतीचा वेळ मिळवून द्यायचा असेल आणि सुसंस्कृत जीवन प्रत्यक्षात यायचं असेल तर यंत्रं व आधुनिक सभ्यता अपरिहार्य आहे.’ (पण याचे ‘लाभ मोजक्यांनीच बळकावू नयेत, आणि सर्वांना ते मिळावेत’ यासाठी समाजसंघटनेमध्ये बदल व्हायला हवा, असा इशाराही त्यांनी दिला होता).
आरंभिक काळातील भूक व संघर्ष भोगल्यानंतर आंबेडकर ‘सुसंस्कृत जीवन’ जगले आणि त्यात विचारपूर्वक केलेलं व वाढलेलं चांगलं अन्न हाही एक भाग होता. देशाचे पहिले केंद्रीय कायदा मंत्री म्हणून नवी दिल्लीत त्यांनी सुसज्ज सरकारी निवासस्थान मिळालं, तिथे एक मोठं डायनिंग टेबल होतं, आणि निरनिराळ्या भोजनासाठी निरनिराळ्या प्रकारची उत्तमोत्तम क्रॉकरी (चिनी मातीची भांडी) आणि चमचे, इत्यादी सामग्री होती. त्यांना ताजं व गरम अन्न जेवायला आवडत असे, त्यामुळे त्यांच्या डायनिंग टेबलपाशी इलेक्ट्रिकवर चालणारी हॉट-प्लेटही ठेवली जात असे.
सविता आंबेडकर यांनी हे सर्व तपशील आंबेडकरांशी संबंधित दस्तावेजांचे संग्राहक विजय सुरवाडे यांना सांगितले होते. त्यांनी पुढील माहितीही नोंदवली आहे. आंबेडकरांचा नाश्ता ‘तीन कोर्स’मध्ये पार पडत असे. आधी पॉरिज किंवा कॉर्न फ्लेक्स; त्यानंतर अंडी- कधी शिजवलेली, कधी हलक्या आचेवर शिजवलेली किंवा कधी आमलेट, भुरजी- आणि त्यासोबत टोस्ट, बटर व वेगवेगळ्या प्रकारचे जॅम ते खात असत; त्यानंतर ते कॉफी घेत. कॉफी त्यांना विशेष आवडत असे. चहा घेणार असतील तर त्यांना उकळलेला चहा, साखर व दूध वेगवेगळ्या भांड्यांतून द्यावा लागत असे (सविता आंबेडकर: १४७-१५०).
Artwork – Vikrant Bhise, 2024
त्यांचं दुपारचं जेवण फारच कमी होतं: सूप, गव्हाच्या पिठाचे दोन लहान फुलके व थोडासा भात, त्यासोबत मांसाहारी पदार्थाचे एक-दोन तुकडे ते घेत असत. मांसाहारामध्ये त्यांना रोस्टेड किंवा कोल्ड मटण; किंवा मासळी, त्यातही हिलसा, तळलेले पॉपलेट किंवा कोळंबी फ्राय हे पदार्थ विशेष आवडत असत. चिकनचेही विविध प्रकार त्यांना आवडत- त्यात चिकन फ्राय, चिकन करी, तंदूरी चिकन, असे पदार्थ त्यांच्या आहारात असायचे. शेवटी ते पुडिंग खात.
शक्यतो रात्रीचं जेवण टाळण्याकडे आंबेडकरांचा कल होता. अशा वेळी ते थेट त्यांच्या खोलीत जाऊन लिहीत किंवा वाचत बसत. मग त्यांना विशेष आवडेल असा पदार्थ करून जेवणासाठी त्यांचं मन वळवायचा प्रयत्न सविता यांना करावा लागत असे.
त्या काळचे काही चित्रपट तारेतारका हैदराबादवरून बिर्याणी मागवत असत, तसंच आंबेडकर त्यांचे कलकत्त्यात सरकारी नोकरी करणारे सहकारी डी. जी. जाधव यांना सांगून हिलसा मासळी बर्फात पॅक करून विमानाने मागवत असत.
चांगल्या अन्नासोबतच चांगले कपडे, चांगली पेनं, चांगलं फर्निचर आणि चांगल्या कलावस्तू व स्थापत्य यांमध्येही आंबेडकरांना रूची होती. त्यांची ही रूची जीवनाच्या एका विशिष्ट तत्त्वज्ञानातून आलेली होती आणि यासाठी त्यांना बुद्धाची शिकवण सहायक वाटत असे. द बुद्ध अँड हिज धम्म या त्यांच्या शेवटच्या पुस्तकात (BAWS 11: 368, 459) आंबेडकर लिहितात:
[बुद्ध म्हणतो,] भूक हा सर्वांत वाईट रोग आहे… आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे, समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे… आपण आनंदाने जगायला शिकलं पाहिजे.
दारिद्र्यांत धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही. त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही. उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे ते म्हणतात. (पण) संपत्ती कमावण्याची प्रक्रिया विनयशासित असली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता.
आंबेडकरांनी मांडलेल्या सार्वत्रिक नीतिमत्तेमध्ये या तात्त्विक भूमिकेचा समावेश होता. जातिव्यवस्थेने बळजबरीने लादलेली भूक आणि गांधीवादातील उपोषणाच्या रूपातील ऐच्छिक भूक, या दोन्हींच्या पूर्णतः विरोधात जाणारी ही भूमिका होती.
संदर्भ:
- आंबेडकर, सविता. डॉ. आंबेडकरांच्या सहवासात, तथागत प्रकाशन: कल्याण, २०१३.
- BAWS: Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches (multiple volumes). Dr Babasaheb Ambedkar Source Material Publication Committee, Government of Maharashtra: Mumbai, 1979 [‘बुद्ध अँड हिज धम्म’मधील अवतरणांसाठी पुढील मराठी भाषांतराचा आधार घेतला: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, अनुवादक- घनःश्याम तळवटकर, प्राचार्य म. भि. चिटणीस, शा. शं. रेगे, धम्म सासन विश्व विद्यापीठ, १९९७].
Fantastic site Lots of helpful information here I am sending it to some friends ans additionally sharing in delicious And of course thanks for your effort